
मुंबई शहर आणि उपनगरांत कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री
मुंबई शहर आणि उपनगरांत कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री होत आहे. हा आंबा दिसायला कोकणातील हापूससारखा असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.त्यामुळे केवळ रंगाला आणि आंब्याच्या दिसण्याला भुलू नका. कोकण हापूसचे साधर्म्य असणारे आंबे मुंबईत फेरीवाले विकत असून, ग्राहकांनी याबाबत सजग राहावे, असे आवाहन कोकणातील हापूस विक्रेत्यांनी केले आहे.कोकणातील देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंबा मुंबईत मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतो.
देवगड हापूस हा रंगाला केशरी, तर खाण्यास चविष्ट असतो. या उलट कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आंब्याला तितकीशी चव नसते. तेथे आंब्याचे भरघोस उत्पादन येत असले तरी, त्याला कोकणातील आंब्याप्रमाणे गुणवत्ता नसते, असे जाणकारांनी सांगितले.कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील आंबा तेथील उत्पादक नवी मुंबई, सांगली, सातारा, पुणे, नाशिक येथील बाजारात विक्रीस पाठवतात.दलाल मंडळी नफा कमावण्यासाठी त्याचप्रमाणे कोकणातील हापूसची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या आंब्याची कोकणच्या हापूससोबत सरमिसळ करतात. विक्रेते, फेरीवाले यांच्याकडून हा आंबा खरेदी केल्यानंतर ग्राहकाला तो ओळखता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते.