
पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुळे ऑक्टेल कंपनीतील १५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमचा सुटला….
रत्नागिरी: मिरजोळे एमआयडीसीतील ऑक्टेल कंपनीमध्ये १५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री कामबंद आंदोलन सुरू केले आणि याच दरम्यान मिरजोळे ग्रामस्थांनी कंपनीवर धडक दिली.
स्थानिक लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी व्यवस्थापकीय संचालक राजीव टंडन यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत, तात्काळ कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी केली. कंपनीत सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी तीन वर्षे पूर्ण झालेल्या १५ कर्मचाऱ्यांच्या ‘कायम’ मागणीला व्यवस्थापनाने यापूर्वी नकार दिला होता. यामुळेच संतप्त ग्रामस्थांनी गेटवर ठिय्या मांडत, जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेत घेतल्याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा घेतला.
या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांनी तातडीने पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे तोडगा काढण्याची विनंती केली. मंत्री सामंत यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीव टंडन यांना फोन करून १५ जणांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची स्पष्ट सूचना केली.
सामंत यांच्या एका फोनमुळे टंडन यांनी ३१ डिसेंबरपूर्वी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि १५ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला.




