
‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांची खेड तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार.
रत्नागिरी : जिल्ह्यातील चर्चेतील विषय मिर्ले गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ श्रीमती वैभवी पाटणे यांचे ठिय्या आंदोलन गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू आहे; मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनासंदर्भात माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हे खेड तहसीलदार यांच्याकडे गेले असता त्यांना तहसीलदारांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली असून, “मला काही फरक पडत नाही, मी तुमचा नोकर नाही आणि हे प्रकरण सोडवणारही नाही… त्या बाईला किती दिवस तिथे बसायचे असेल तीने खुशाल बसावे… तुम्ही स्वतःला काय समजता !… मला विचारणारे तुम्ही कोण ?” अशा स्वरूपाचे वादग्रस्त आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी वंचितचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मिर्ले गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ श्रीमती वैभवी पाटणे गेली ३६ दिवस खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत आहेत, त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडे श्रीमती वैभवी पाटणे यांनी दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी लेखी निवेदनाव्दारे तक्रार दिली आहे, याच तक्रारीच्या अनुशंगाने २२ एप्रिल २०२५ रोजी २ वाजण्याच्या सुमारास भेट घेण्यासाठी खेड तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्याकडे मी व माझे कार्यकर्ते गेलो होतो.
यावेळी चर्चा सुरू असताना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या एका पत्राबाबत विचारणा केली असता, ते भडकले व आपल्या आसनावरून उठून तावातावाने म्हणाले की, हा मुद्दा माझा नाही…. तुम्ही कोर्टात जावून दाद मागावी….. मी काही करू शकत नाही, तुम्हाला जे काय करायचे ते करा…… कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माझी तक्रार करायची आहे ती करा…… मला काही फरक पडत नाही, मी तुमचा नोकर नाही आणि हे प्रकरण सोडवणारही नाही…… त्या बाईला किती दिवस तिथे बसायचे असेल तीने खुशाल बसावे…. तुम्ही स्वतःला काय समजता !… मला विचारणारे तुम्ही कोण ? अशी बेताल व अर्वाच्च विधाने करीत ते रागाने बाहेर पडत आपल्या गाडीच्या दिशेने निघाले, तरीही आम्ही त्यांना विनंती करीत त्यांच्या मागोमाग जात श्रीमती वैभवी पाटणे यांच्या विषयाबाबत सामाजिक सलोखा राखण्याकरीता व या प्रकरणातून मार्ग काढण्याची विनंती करीत असतानाही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व तावातावाने आपल्या गाडीत बसून निघून गेले, असे ही निवेदनात नमूद केले आहे.यापुढे अशा मुजोर, बेजबाबदार अधिकाऱ्याच्या सर्व्हिस बुकला नोंद करून कार्यालयीन पातळीवर कठोर कारवाई व्हावी, कारण सर्वसामान्य जनतेशी यांची अशीच मुजोरी आहे. हे माझ्याशी झालेल्या त्यांच्या बेजबाबदार वागणुकीवरून व विधानावरून लक्षात येते तरी लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी कारवाईची लेखी मागणी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे केली आहे. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या खेड तहसीलदारांवर जिल्हाधिकारी कोणती कारवाईची भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.