
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जंगलात बिबट्याचे दुर्मीळ असे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळले
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जंगलात स्थानिकांना बिबट्याचे दुर्मीळ असे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळले आहे.रत्नागिरी बुधवारी स्थानिक रहिवासी कामानिमित्त जंगलात गेले असता त्यांना तेथे दोन बिबट्याची पिल्ले आढळली. त्यातील एक पिल्लू पांढऱ्या रंगाचे, तर दुसरे पिल्लू नेहमीसारखेच होते. प्रथमदर्शनी पांढऱ्या पिल्लाला पाहिले असता स्थानिकांचा गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच मादी बिबट्याने पिल्लांना दुसऱ्या जागी हलवले होते. पांढरे पिल्लू हे दुर्मीळ असल्याने यासाठी रत्नागिरीतील जंगल परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून त्या माध्यमातून पिल्लू व त्याच्या आईच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
या पांढऱ्या बिबट्याच्या पिल्लामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये आणि वन्यजीवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. गिरीजा देसाई ,विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी , प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार आणि वनपाल तौफिक मुल्ला आदींनी घटनास्थळी भेट दिली असून परिसरात लावलेल्या कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान,बिबट्याचे पिल्लू पांढरे असण्यामागे काही नैसर्गिक कारणं असू शकतात. त्यामध्ये प्रमुखतः ल्यूसिझमकिंवा अल्बिनिझम ही आनुवंशिक स्थिती कारणीभूत असते.