
येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली,. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार परस्परांना भिडले.
येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार परस्परांना भिडले.बैठकीत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. पीओपी मूर्तींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणी जखमी झाले असून याप्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली. ही बंदी येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील गणेशोत्सवातही लागू राहणार असून त्यानुसार आतापासूनच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.
गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांची बैठक बोलवली होती. परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ही बैठक निर्णयांपेक्षा हाणामारीनेच गाजली.ही बैठक सुरू होण्यापूर्वीच शाडू मातीपासून मूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपीचे कारागीर एकमेकांना भिडले. सुरुवातीला त्यांनी एकमेकांवर शेरेबाजी केली. त्यानंतर शाब्दीक चकमक उडली आणि एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या, माईक , खुर्च्या फेकण्यात आल्या. या वादातच बैठक पार पडली.