
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना रत्नागिरीतील मुख्य कार्यक्रम आता १२-१५ वाजता.
रत्नागिरी, दि. 25 : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ 800 नागरिकांना मिळाला आहे. उद्या शनिवार दि. 26 एप्रिल रोजी ही रेल्वे प्रभू श्री राम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्याकडे धावणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमाच्या वेळेत बदल झाला असून, सकाळी 10 ऐवजी आता दुपारी 12.15 वाजता होणाऱ्या प्रमुख सोहळ्यास पालकमंत्री डॉ. उदय सामंत, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच खेड रेल्वेस्थानकावरही दुपारी 12.30 ऐवजी नवीन वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले होते. त्याला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठीची ही पहिली रेल्वे 26 एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून दुपारी 1 वाजता ही रेल्वे अयोध्येकडे रवाना होणार आहे. या रेल्वेचा दुसरा थांबा खेड रेल्वेस्थानकावर असणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दुपारी 12.15 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर, संगमेश्वर या तालुक्यातील लाभार्थ्यांनी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. तसेच, खेड रेल्वे स्थानक येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी मंडणगड, दापोली, चिपळूण, खेड तालुक्यातील लाभार्थ्यांनी दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000