
बंगालातील हिंसाचारास जबाबदार ठरवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जातो, पण हिंदू नरसंहाराची जबाबदारी घ्यायला निर्लज्ज केंद्र सरकार तयार नाही-ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतात आबादी आबाद सुरू असल्याचे चित्र रंगवले जात असतानाच काश्मिरात गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला.26 पर्यटकांच्या शरीरांची बंदुकांनी चाळण करून अतिरेकी पसार झाले. जाताना त्यांनी जिवंत पर्यटकांना निरोप दिला, ”मोदींना सांगा इथे काय घडले!” पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे नेते पाकिस्तानला घरात घुसून मारण्याच्या पोकळ धमक्या आणि इशारे देत असतात. प्रत्यक्षात सीमा पार करून अतिरेकी भारतात घुसून निरपराध हिंदूंना मारत आहेत. संपूर्ण देशातच धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यावर दुसरे काय होणार? अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काश्मिरात पुन्हा एकदा हिंदूंचा नरसंहार झाला आहे. रक्ताचे सडे आणि हिंदू मृतांचा खच पडल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मिरात पोहोचले. अमित शहा आता काय करणार? काश्मिरातील हिंदू नरसंहाराची जबाबदारी घेऊन अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. पश्चिम बंगालातील हिंसाचारास जबाबदार ठरवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जातो, पण हिंदू नरसंहाराची जबाबदारी घ्यायला निर्लज्ज केंद्र सरकार तयार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.