
रामदास कदमांची भाषा बदलली, महायुतीबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले जे चुकले ते…
विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमही आपला मुलगा योगेश कदम यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. योगेश कदम हे शिंदे गटाकडून दापोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. या निमित्ताने कदम पिता- पुत्र सध्या दापोलीत ठाण मांडून आहेत. यावेळी बोलताना रामदास कदम यांची भाषा बदलल्याचे दिसून आले आहे. त्यांनी महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.*सर्वांना सोबत घेवून आपल्याला पुढे जायचं आहे असं ते म्हणाले आहेत. शिवाय जे चुकले त्यांनाही बरोबर घ्यायचं आहे असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. कदम यांनी लोकसभा निवडणुकी आधी आणि नंतर भाजपवर जोरदार टिका केली होती. शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला होता. आता विधानसभेच्या तोंडावर कदम यांनी मात्र नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ही भूमिका का घेतली याची चर्चा सध्या दापोली विधानसभा मतदार संघात आहे.दोपाली मतदारसंघातून योगेश कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दापोली मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नव्हते. जवळपास आठ हजाराचे मताधिक्य हे अनंत गितेंना मिळाले होते. या मतदारसंघातून काही झाले तरी 25,000 मतांचे मताधिक्य देण्याचे वक्तव्य योगेश कदम यांनी केले होते. पण तसे झाले नाही. ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जाते. त्यामुळे रामदास कदम यांनी आता लेकासाठी पुढाकार घेतला आहे. ते स्वत: मैदानात उतरले आहे. शिवाय त्यांनी नरमाईची भूमिका घेत स्थानिक भाजप नेत्यां बरोबर जुळवून घेण्याचे ठरवले आहे.मंडणगड इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आम्हाला सर्वांना सोबत घेवून जायचं आहे असे वक्तव्य केले आहे. शिवाय ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांनाही बरोबर घ्याचे आहे असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मताधिक्य मिळालं म्हणून त्यांनी हुरळून जावू नये. विधानसभेला योगेश कदम हे साठ हजार मतांनी निवडून येतील असे रामदास कदम म्हणाले. लोकसभेला मुस्लिम समाज नाराज होता. दलित समाजाने संविधानामुळे विरोधात मतदान केले. तर कुणबी समाजाने गितेंना पाठिंबा दिला. पण ही स्थिती लोकसभेला राहाणार नाही. विरोधकांनी दापोलीस विजय मिळवण्याचे स्वप्न पाहू नये असे ते म्हणाले.दापोलीमध्ये जो विकास झाला आहे तो आपणच केला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची संधी त्यांनी यावेळी सोडली नाही. पक्षात फुट पडली तेव्हा ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता. त्यावेळी आपण त्यांना काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला दिला होता. तसे त्यांनी केले असते तर सर्व आमदारांना परत मातोश्रीवर आणण्याचा शब्द दिला होता. मात्र त्यांनी तसे केले नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप कदम यांनी यावेळी केला. पन्नास खोक्यांचा आरोप चुकीचा असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान आपल्याला शिवसेना का सोडावी लागली याचे हे सांगण्यासाठी आपण पुस्तक लिहीणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.