
आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे १० जुलै २०२५ ते १४ जुलै २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश
महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे १० जुलै २०२५ ते १४ जुलै २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड श्री.किशन ना. जावळे यांनी जारी केले आहेत.
या मार्गाचे सध्या सुधारणा काम कंत्राटदार RPP-SIPL (IV) यांच्यामार्फत सुरू आहे. मात्र, पायटा गावापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर दरडप्रवण क्षेत्र असल्याने अलीकडील जोरदार पावसामुळे डोंगरावरून माती, दगड आणि गोठे रस्त्यावर आले आहेत. या अडथळ्यांचे हटवण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर सुरू असून, त्यास ३ ते ४ दिवस लागणार आहेत.
प्रत्येक पावसाळ्यात या भागात अशा प्रकारच्या घटना घडत असतात. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो, तसेच आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रायगड व तहसीलदार पोलादपूर यांनीही रस्त्यावरून वाहतुकीस बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.