पर्यटकांना वाचविण्यासाठी सय्यद आदिल हुसैन शाहा थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.


पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून वेचून मारले.अनेक राज्यातील २६ लोकांचा या हल्ल्यात जीव गेला. यामध्ये स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह याचाही समावेश होता. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम तो करत होता. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.

आदिल हुसैनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचे काम करणारा आदिल त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन वर गेला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तातडीने मुलाला फोन लावला, तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर ४ वाजून ४० मिनिटांनी त्याचा फोन सुरू झाला. पण समोरून कुणीही उत्तर देत नव्हते. आम्ही पोलीस ठाण्यात गेलो आणि माहिती घेतली असता तो जखमी झाल्याचे कळले.

मृत आदिलच्या आईने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, तो आमचा एकुलता एक आधार होता. घोडे भाड्याने देऊन तो कुटुंबासाठी पैसे कमवत होता. आता आमच्या उदरनिर्वाहाचे काय. त्याच्याशिवाय आमचे भविष्य काय? याची कल्पनाही करवत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button