
“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियानाला १ मेपासून होणार सुरुवात.
अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांचे आवाहन रत्नागिरी : राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे.” कंपोस्ट खड्डा भरून, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” वाटचाल दृष्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या नावाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृष्मान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणेसाठी ग्रामीण जनतेच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गावातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून सार्वजनिक स्वच्छताविषयक बाबीची लोकांमध्ये जाणीव जागृती करणे, घनकचऱ्याचा पुनर्वापर करणे, पर्यावरण पूरक उपाययोजना करण्यासाठी १३८ दिवसांचे हे विशेष अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन तालुकानिहाय नियोजन सादर करण्याबाबत आदेशित केले आहे.अभियानाच्या पूर्व तयारीसाठी गाव पातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालयासह गावातील दर्शनी भागात नोटीस लावून याबाबत माहिती देणे, अभियान पूर्व गावातील घरगुती व सार्वजनिक स्तरावरील ओला व सुका कचरा संकलित करून ठेवणे, व १ मे रोजी गावात ग्रामसभा घेवून अभियानाची माहिती देवून हा गोळा केलेला ओला कचरा नॅडेप खड्ड्यात जमा करून अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.
या कचऱ्यावर प्रकिया करून खड्डयात सेंद्रिय खत निर्माण केला जाणार आहे.तालुका स्तरावर नियंत्रण हे अभियान कार्यक्रमाचे नियंत्रण गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. प्रकल्प संचालक यांनी ५ टक्के गावाची तपासणी करणे तर गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील संख्येच्या ५ टक्के तपासणी करणे अवश्यक आहे. दोन विस्तार अधिकारी यांच्यामार्फत २० ते ४० टक्के, तर तालुका संपर्क सल्लागार यांनी १० टक्के तपासणी करणे अनिवार्य राहणार असून उर्वरित गावात गट समन्वयक यांनी पाहणी करणे आवश्यक राहणार आहे.या अभियानात लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांच्यासह गावातील महिला बचतगट, युवक मंडळे यांच्या सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील अभियानाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शन खाली प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल देसाई, गटविकास अधिकारी व जिल्हा कक्षातील सल्लागार करत आहेत.अभियानचा उद्देश गावातील कचऱ्याचे निर्मूलन करणे, दृश्मान स्वच्छता विषयक बाबीत सुधारणा करणे, गाव पातळीवर नॅडेप पद्धतीचा अवलंब करणे होय. “राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवून गावातील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे,” असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.