
मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रांत धावणार बाईक टॅक्सी.
मुंबई पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेल्या २९ महानगरे व १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य ६ शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी झाला.राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक (ग्रीगेटर) सेवा आता सुरू होतील. ओला-उबेर वा टॅक्सी चालवणा-यांकडून होणाऱ्या विरोधाला न जुमानता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर जारी केला. सोमवारी राज्य सरकारच्या गृह विभागाचे कक्ष अधिकारी सागर पाटील यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय जारी करण्यात आला.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वा ही सेवा पुरविणाऱ्या संस्था वा कंपन्यांचे नियमन राज्याचा परिवहन विभाग करीत असून राज्याच्या प्रशासनात हा विभाग मात्र गृह विभागाचाच एक भाग आहे. त्यामुळे गृह विभागातर्फे हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या एक एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली होती. ही सेवा पुरविण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांना इलेक्ट्रिक बाईकच वापराव्या लागणार आहेत. एका बाईकवर एकच प्रवासी एकावेळेस नेण्याची अनुमती असेल. तसेच बाईक चालकाचे किमान वय २० ते कमाल वय ५० वर्षे असेल.
त्यामुळे ५० वर्षांहून अधिक वयाच्या चालकांनी ही बाईक टॅक्सी चालविता येणार नाही तसेच १२ वर्षाखालील प्रवासी या बाईक टॅक्सी सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, ही अट सरकारने निश्चित केली आहे. प्रति फेरी करिता जास्तीत जास्त १५ कि.मी. अंतराची मर्यादा असेल म्हणजे १५ किमीच्या पुढे प्रवास ई-बाईकला करता येणार नाही. या अंतरापेक्षा अधिक अंतरावर जायचे असेल तर प्रवाशांना शासकीय वा अन्य खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांचा अवलंब करता येईल. अंतराची ही अट टाकून खासगी टॅक्सी, ओला-उबेरसारख्या कंपन्यात कार्यरत टॅक्सी यांनाही व्यवसाय मिळेल, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे.