दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात 28 जणांच्या मृत्यूची भीती; महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश, आकडा वाढण्याची शक्यता


जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले आहेत आणि पंतप्रधान मोदींनी अमित शहांशी फोनवरून बोलले आहे यावरून परिस्थितीचा अंदाज येतो. जखमीमध्ये पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच जखमीमध्ये 2 जण महाराष्ट्रातील पर्यटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत. तर जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्यात येत आहे. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे ही माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. ते सतत सरकारच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या 10 दहशतवाद्यांमध्ये 6 दहशतवादी हे स्थानिक होते तर 4 दहशतवादी हे परदेशी असल्याचं सांगण्यात येतं आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असं सांगण्यात येतं आहे. या कटात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केला आहे, जे आता छोटे हल्लेखोर गट तयार करत आहेत आणि निष्पाप लोकांना मारत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजचा हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button