
गुहागरच्या लोकशाही दिनात रस्त्यावरील खड्डे चांगलेच तापले. राष्ट्रीय महामार्गाच्या सक्षम अधिकाऱ्यांना दोन दिवसांत जनतेसमोर बोलवणार : नायब तहसीलदार मेहता
आबलोली : गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह या रहादारीच्या प्रमुख रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय लोकशाही दिनात चांगलाच तापला; मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत त्यांना जनतेसमोर बोलावण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार श्रीमती मेहता यांनी जनतेला दिले.
दरम्यान या लोकशाही दिनात बोलताना पत्रकार पराग कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ रहाटे, अनिल शिंदे, सतीशदादा शेटे, सुमित आठवले, अभिजित मर्दा, विकास जाधव, अमित जोशी, अरुण भुवड, सखाराम अवेरे, यांनी मागणी केली की हा रस्ता अपघात काळ ठरत आहे. आम्हाला हा रस्ता त्वरित दुरुस्त करून मिळावा. ३० एप्रिलपर्यंत हा रस्ता चांगले कार्पेट मारून जनतेला उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी लागेल. यावर गुहागर नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी यांनी रस्त्यासाठी ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय महामार्ग करण्याला पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर रिमाईंड लेटर देखील देण्यात आल्याचे सांगितले.
आजच्या लोकशाही दिनाला सर्व खात्याचे प्रशासकीय अधिकारी, तसेच जनता बहुसंख्येने उपस्थित होती. प्रामुख्याने आजच्या लोकशाही दिनाला महामार्ग खड्डे तसेच अन्न सुरक्षा अधिनियम २००३ चा जनतेला लाभ मिळत नाही, यावर व गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नि स प्र जागा नावावर वर्ग होत नसल्याबाबत विचारणा झाली. तसेच शहरातील व इतर घरावर आलेली झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान आजचा लोकशाही दिन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. शेवटी नायब तहसीलदार श्रीमती मेहता यांनी सर्वांचे आभार मानले.