
राजापुरात गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त,
राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. राजापूर पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत २१,६०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल दीपक काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण १५ खाकी बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रत्येक बॉक्समध्ये प्लास्टिकच्या बॉब्स लिमन व्होडका गोवा बनावटीच्या १८० मिली मापाच्या एकूण ७२० सीलबंद बाटल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून १,००,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी गाडी देखील जप्त केली आहे.
अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १,२१,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.