
दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य जिल्ह्यातील नऊ जणांचा सहभाग.
आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा ,असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो.पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही.ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागतो अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच.अशा अतितीव्र दिव्यांग बांधवांसाठी दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ,अशोक भुस्कुटे परिवाराने विमान प्रवास सहल आयोजित केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ९ दिव्यांगांनी, दिव्यांगांची गगनभरारी या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविला. आपल्या तीव्र दिव्यांगत्त्वामुळे, घराचा उंबरठा ओलांडता येत नाही, असा दिव्यांग या विमान प्रवास सहलीसाठी, निवडण्यात येते. गेली अनेक वर्षे, दिव्यांगमीत्र अशोक विठ्ठल भुस्कुटे, चिपळूण हा उपक्रम, विनाशुल्क राबवत आहेत. या वर्षी, मुंबई – राजकोट असा, विमान प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आले. दिनेश पोतनीस, डोंबिवली, यांनी, विमान प्रवास, तिकीटाचे, प्रायोजकत्त्व स्विकारले. चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, मंगेशजी पेढांबकर यांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी, सुरक्षित प्रवासासाठी, शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण चिपळूणमधून रात्री १० वाजता टेंपो ट्रॅव्हलरने व्हीलचेअरसह निघाले ते सकाळी ९ वाजता मुंबई विमानतळ.तेथे इंडिगो विमानाच्या स्टाफने दिव्यांगाना खूप छान सहकार्य केले.११ वाजता विमान राजकोटच्या दिशेने झेपावले.अवघ्या १ तासात राजकोट विमानतळावर दाखल झाले.दुसऱ्या दिवशी मिनी बसने राजकोट – गिरनार, आयुष्यात कधीच न जाऊ शकणाऱ्या दिव्यांगाना रोप-वे ने गिर पर्वतावर सफर घडवण्यात आली. तिसऱ्या दिवशी सोरटी सोमनाथ १२ ज्योतीर्लींगातील पहिले ज्योतीर्लींग दर्शन. गिर नॅशनल पार्क व जंगल सफारी. दिव्यांगांनी काही काळासाठी आपले दिव्यांगत्त्व विसरून परिपूर्ण पर्यटनाचा आनंद घेतला. संजय जानी, गुजरात मधील आमचा बसचालक, अतिशय सहकार्याच्या भुमिकेत होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात या इसमाने, स्वखर्चाने, सर्व दिव्यांगांना व सहकाऱ्यांना उसाचा रस व शितपेय पाजले. हाॅटेल ते रेल्वे स्टेशन अशा प्रवासासाठी, त्याने मोफत बससेवा उपलब्ध करून दिली व सर्व दिव्यांग ट्रेन मध्ये चढले,बसले व मार्गस्थ झाले, तोपर्यंत स्टेशन वर उपस्थित होते. ” अशा उपक्रमांना प्रतिसाद देत, घर सोडा आणि आहे त्या परिस्थितीत आनंद शोधा आणि तो मिळवा.” विमान प्रवास सहलीच्या समारोप प्रसंगी आर एच पी फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे, दिव्यांगांशी संवाद साधत होते. जे स्वतः तीव्र दिव्यांग असूनही, इतर दिव्यांगांना प्रेरणादायी असा, सर्वसामान्य लोकांसारखा त्यांचा वावर असतो. दुर्गाशक्ती अध्यक्षा अश्विनी अशोक भुस्कुटे यांनी, सहभागी दिव्यांगांचे, पुढील आयुष्य सुकर होण्यासाठी काही टीप्स दिल्या. या सहलीत भारती काशा तबीब (पाजपंढरी), मधुकर लक्ष्मण मेढेकर(दापोली), स्मिता पद्माकर पाटील. (भंडारपुळे),प्रितम उदय कदम. ( रत्नागिरी) सौरभ शिवाजी पोमेंडकर( गावडे आंबेरे), रक्षंदा आणि रिया संदीप चिपळूणकर( चिपळूण), राकेश रामचंद्र गोठणकर(कशेळी), सादीक करीम नाकाडे(साईनगर) अशा ९ दिव्यांगानी सहभाग घेतलेला होता. दिव्यांग विमान प्रवास मिशन यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, वेळोवेळी दिव्यांगांना उचलणे.व हे काम समिर करीम नाकाडे, लौकीक माधव सावंत व अमृता हमिद भुस्कुटे यांनी, लीलया पार पाडले. सारिका चिपळूणकर व अप्पा भोसले,दुर्गा भुस्कुटे, ओम भुस्कुटे,आरोही भुस्कुटे यांचेही सहकार्य लाभले.