
घराबाहेर ठेवलेल्या लाल रंगाच्या बाटल्याना खरंच कुत्री घाबरतात?
महाराष्ट्रापर्यंत देशभरातल्या विविध राज्यांमध्ये घरांच्या आणि दुकानांच्या बाहेर लाल पाण्याच्या बाटल्या टांगलेल्या असतात. लोकांमध्ये असा समज आहे की, या बाटल्यांमुळे कुत्री घाण करीत नाहीत, गोंधळ घालत नाहीत. एकूणच काय तर कुत्री या बाटल्यांना भितात आणि त्यामुळे त्या परिसरात फिरत नाहीत, असे लोक मानतात. परंतु, हे खरंय का? या लाल पाण्याच्या बाटल्यांमागील नेमकं सत्य याबाबत तज्ञ काय म्हणतात हे पाहणे गरजेचे आहेलाल पाण्याने भरलेल्या बाटल्यांमुळे कुत्रे घराच्या जवळ येत नाहीत, याविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा पाहायला मिळते. लोक असे सांगतात की, जेव्हा कुत्रे या रंगीत बाटल्या पाहतात, तेव्हा ते घाबरतात आणि परिसरातून पळून जातात.
त्यामुळे घराच्या आजूबाजूला घाणही होत नाही. विशेषतः ग्रामीण भागात ही पद्धत खूप लोकप्रिय आहे; परंतु आता शहरातील नागरिकही याचा अवलंब करताना दिसून येत आहेत.३० वर्षांचा अनुभव असलेले वरिष्ठ पशुवैद्य डॉ. अजय रघुवंशी यांनी सांगितले की, ही मान्यता पूर्णपणे चुकीची आहे आणि या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. डॉ. रघुवंशी सांगतात की, कुत्र्यांना माणसांसारखे रंग दिसत नाहीत. त्यांना सर्व कृष्णधवल दिसते. ते केवळ तीन रंग पाहू शकतात, म्हणजेच निळा, पिवळा व तपकिरी (तपकिरी रंग हा निळा आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असते). कुत्र्यांना लाल रंग अजिबात दिसत नाही आणि घरासमोर अशा स्वरूपाच्या लाल बाटल्या ठेवल्याने कुठलाही उपयोग होत नाही.डॉ. रघुवंशी यांनी हेदेखील स्पष्ट केले की, लाल पाण्याच्या बाटल्या कुत्र्यांना दूर ठेवतात हा दावा केवळ एक अफवा आहे. अशा कोणत्याही दाव्याला विज्ञानाचा आधार नाही आणि त्याला कुठलाही अर्थ नाही.
प्रत्यक्ष पाहायला गेल्यास डोळ्यांपेक्षा कुत्री नाक आणि कान या इंद्रियांवर जास्त अवलंबून असतात. त्यामुळे अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये, असे तज्ज्ञ सांगतात.त्यामुळे कुत्र्यांना घाबरवण्यासाठी किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी रंगांचा वापर करणे, याला कोणताही अर्थ नाही. ही एक प्रकारची दिशाभूल आहे. कुत्र्यांच्या वर्तनावर रंगाचा परिणाम होत नाही. ते विशिष्ट गंध आणि आवाजाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला ओळखू शकतात किंवा एखादी वस्तू अथवा ठिकाणाचा शोध घेऊ शकतात.