
वैचारिक मतभेद परस्परांच्या स्नेहसंबंधात अडचण ठरता कामा नये : न्यायमूर्ती प्रसन्न वराळे ॲड. विलास पाटणे यांच्या “न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ न्यायमूर्ती एच. आर खन्ना” पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन.
रत्नागिरी : “महाराष्ट्राला थोर पुरुषांची परंपरा आहे, तशीच बौद्धिक, साहित्य, परस्परांच्या आदराची ही परंपरा आहे. वैचारिक मतभेद परस्परांच्या स्नेहसंबंधात अडचण ठरता कामा नये. आपण विरोधक आहोत, पण वैरी नाही ही परंपरा महाराष्ट्राच्या त्यावेळच्या नेत्यांनी जपली होती. अशा पद्धतीच्या परंपरेपासून दूर जाता कामा नये. न्यायालयानेही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करायला हवा”, असे प्रतिपादन करतानाच वाचन जगाची ओळख करून देते अधिक शहाणे बनवते, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचत राहा, आहे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी येथे केले. रत्नागिरी बारसोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक ॲड. विलास पाटणे यांच्या “न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ न्यायमूर्ती एच. आर खन्ना” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (१९ एप्रिल) शहरातील विवेक बँक्वेट हॉल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ वकील, लेखक ॲड. पाटणे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माधव जामदार, रत्नागिरी प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायमूर्ती वराळे म्हणाले की, “पुस्तकाच्या प्रस्तावनेत न्यायाधीश अभय ओक यांनी न्यायमूर्ती खन्ना यांचा उल्लेख आधुनिक राम शास्त्री अशा सार्थ शब्दांत केला आहे.

अत्यंत निःस्पृह, निर्भीड, परिणामांची भीती न बाळगता आपल्या मूल्यांवर ठाम राहून न्यायालयाचे मूल्य ठामपणे बजावणाऱ्या न्यायमूर्ती खन्ना यांच्यामध्ये ही वृत्ती वार्षाने आली आहे त्यांचे वडील देखील विधीज्ञ होते तेही निर्भीड होते त्यांचा हा गुण खन्नांमध्ये येणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांचा प्रवास अतिशय उत्कृष्टरित्या पुस्तकात मांडला आहे. संविधानात दुरुस्ती करू शकता मात्र संविधानाचे मूळ बदलू शकत नाही, हे संविधानाचे तत्व न्यायमूर्ती खन्ना यांनी निकाल पत्रातून आपल्याला जाणवून दिले. त्याबद्दल त्यांचे आभारी राहिले पाहिजे. या व्यक्तिमत्त्वाविषयी नक्की वाचले पाहिजे त्यांचे नवीन आयाम यातून उघडतात.”आजकाल वाचनाचा भाग कमी झालेला आहे ही खंत व्यक्त करताना वाचनाविषयी टोकाची आसक्ती कशाप्रकारे असू शकते याबद्दल सांगताना डॉ. आंबेडकर यांनी घर बांधताना एक संपूर्ण मजला पुस्तकांसाठी राखून ठेवल्याचे उदाहरण दिले. आत्मचरित्रे, राष्ट्र पुरुषांची पुस्तके अशी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचा. पुस्तके वाचणे शक्य नसल्यास किंडल किंवा तत्सम तांत्रिक सामग्रीची मदत घ्या. पुस्तकातून ज्ञान संपादन करा ही प्रक्रिया कष्टाची आहे पुस्तकातून मिळते ते खऱ्या अर्थाने ज्ञानार्जुन असते. व्हाट्सअप वर येते ती माहिती ती जरूर असावी पण ते ज्ञान नव्हे त्याला ज्ञान समजण्याची चूक करू नका,” असे ही न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संपूर्ण भाषणात आपल्या ओघवत्या शैलीत अनेक साहित्यिकांचा, त्यांच्या कवितांचा, अभंगांचा दाखला देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लेखक ॲड. पाटणे यांनी देश भांबावलेला असताना न्यायमूर्ती खन्ना यांनी लोकशाही वाचवण्याचे सांगितले. लोकमान्य टिळक , डॉ. आंबेडकर, न्यायमूर्ती खारेघाट यांचा दाखला देत कोकणाला धैर्याची प्रचंड मोठी परंपरा असल्याचे सांगताना त्याच परंपरेने न्यायमूर्ती खन्ना चालत राहिले. वाचणारा नसेल तर लिहिण्यालाही अर्थ उरत नाही, असे नमूद करतानाच सर्वसामान्यांना न्यायव्यवस्थेकडून फार अपेक्षा आहे ही विश्वासार्हता दृढ केली पाहिजे, असे सांगितले.रत्नागिरी प्रधान जिल्हा न्यायाधीश गोसावी यांनी न्यायमूर्ती खन्ना यांच्यासमोर कसे आवाहन होते ते त्यांनी कसे पेरले आणि अतुलनीय धैर्य दाखवून भविष्याचा विचार करून कसे न्यायदान केले याचा सुंदर उल्लेख लेखक ॲड. पाटणे यांनी पुस्तकात केल्याचे नमूद केले. आपले निकालपत्र आधी फुटू नये याचे दडपण खन्नांवर त्यावेळीच नव्हे तर आजही आमच्यावर असते. म्हणूनच अर्धा निकाल आधी सांगायचा अर्धा नंतर अशी नीती अवलंबली जात असल्याचे सांगितले. या पुस्तकातून न्यायाधीश विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यासारखे असून त्यांनी या पुस्तकाचा धांडोळा घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश जामदार यांनी मनोगत व्यक्त करताना जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण करणे हा आपला अधिकार आपण कायम संरक्षित ठेवला पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, ती त्याने पाळल्यास खऱ्या अर्थाने खन्ना यांना अभिवादन ठरेल, असे सांगितले. न्यायमूर्ती कर्णिक यांनीही विविध पैलूंना स्पर्श करत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राज्यघटनेचे पूजन आणि रोपट्याला जलाअर्पण करून करण्यात आली.या प्रकाशनाला सोहोळ्याला ऍडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्नचे अध्यक्ष ॲड प्रशांत रेळेकर हजर होते. ,तसेच जिल्ह्यासह सिंधुदुर्ग महाड, मुंबई येथील न्यायिक अधिकारी, वकील, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. राकेश भाटकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी केले. रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव रत्नदीप चाचले यांनी आभार मानले.