
पाझर तलावात तीस वर्षे खडखडाट.
चिपळूण तालुक्यातील पाचाड येथील पाझर तलावाचे काम गेली ३० वर्षे रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्धवट स्थितीतील या तलावामुळे पाणीसाठा होत नसून साचलेल्या गाळामुळे कायम खडखडाट पहायला मिळत आहे. यामुळे या तलावाचा पशु पक्ष्यांबरोबर ग्रामस्थांनाही कोणताच उपयोग होत नाही. अन्य नैसर्गिक जलस्त्रोत नसल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले असून या पाझर तलावाचे काम पूर्ण करून पाणीसाठा करावा, अन्यथा १ मे रोजी ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्री व विभागांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पाचाड ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाचाड ग्रामपंचायत हद्दीतील चिलनी या ठिकाणी १९९४-९५ साली पाझर तलाव बांधण्यात आला होता. त्याचे काम अपूर्ण स्थितीत असून त्यामध्ये पाणीसाठा होत नसल्याने त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नागरिकांना व जंगली प्राण्यांना सुद्धा होत नाही. पाझर तलावासाठी अनेक शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या असून त्यांना सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही. पाचाड गावामध्ये पाण्याचा कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक स्त्रोत नसून जानेवारी महिन्यात पाणी टंचाई चालू होते. ग्रामपंचायत पाचाड मार्फत कळवंडे येथील विहिरीतून ३ किलोमीटर पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जातो तो सुद्धा अपुर्या प्रमाणात होत असतो. पाण्याअभावी पिण्याचा तसेच पशुधन व शेती यांच्यासाठी पाणी समस्या खूप त्रासदायक असून शासनाकडे वेळोवेळी मागणी करून कोणी त्याकडे लक्ष देत नाही आणि त्या पाझर तलावाबाबत पंचायत समिती किंवा जलसंधारण विभाग यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.तरी पाझर तलावाची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे हे निश्चित करावे. पाझर तलावाची दुरूस्ती करावी व गाळ काढावा जेणेकरून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाणीप्रश्न कायमचा सुटेल. मायबाप सरकार आमच्या या रास्त मागण्यांची दखल त्वरित योग्य कार्यवाही करेल याची आम्हाला अपेक्षा आहे. www.konkantoday.com