
आम्ही प्रेमाने सगळे ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू, उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शालेय शिक्षणात हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदीची सक्ती पहिलीपासून कशासाठी असा सवाल त्यांनी केला.आम्ही प्रेमाने सगळे ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. ते दादरच्या शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह येथील महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित करीत होते.
जे अमराठी मुंबईमध्ये राहताहेत, वर्षानुवर्षे, पिढ्यानं पिढ्या राहताहेत त्यांना ‘चला मराठी शिकवूया’ हे अभियान शिवसेनेने सुरू केले. त्याला उत्तर भारतीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे हे बघितल्यानंतर यांच्या पोटात गोळा आला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. इथे राहता, इथले मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता, असा सवाल करताना जसे आपण म्हटले होते ‘इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’ तसे ‘इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलनाही होगा, असा इशारा ठाकरे यांनी दिला.