
रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. वसंत महेश्वर बापट (५८, रा. गोळप, रत्नागिरी) यांच्या मालकीचा हा गोठा होता. आगीमध्ये गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गोळप येथील रहिवासी वसंत बापट यांनी घराजवळच गेल्या अनेक वर्षापासून हा गोठा होता. त्यामध्ये गायी, वासरे म्हशी व रेडा अशी २० जनावरे यांचे पालनपोषण केले जात होते. जनावरांसाठीचा गवत, पेंढा व त्यांच्यासाठी लागणारे पशुखाद्य गोठ्यामध्ये ठेवण्यात आले होते. १७एप्रिल रोजी रात्री ८.३०च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यानंतर विद्युत पुरवठा सुरु झाल्यानंतर येथे विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉर्टसर्किट झाल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात भाताचा पेंडा व गवत गोठ्यामध्ये असल्याने शॉर्टसर्किटमुळे येथे आगीची ठिणगी पडली.गवत व पेंढ्याने जोराने पेट घेतल्यानंतर आगीला भयावह स्वरुप प्राप्त झाले. आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळत असल्याने गोठ्यातील जनावरांना बाहेर काढणे अत्यंत कठीण बनले. यावेळी तातडीने पूर्णगड पोलीस ठाण्यात फोन केल्यानंतर फिनोलेक्स कंपनीचा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आले, मात्र यात ११ जनावरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ३ जनावरे गंभीररित्या जखमी झाली तर ६ जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यातही काहींना इजा झाली आहे.आगीची तीव्रता एवढी होती की, गवत आणि पेंढ्यामुळे सकाळपर्यंत आग धुमसत होती. सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी पोद्दार व कशालकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. त्यात गोठ्याच्या इमारतीचे सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचे झाले