
*मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें*
_मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सरकारने विशेष अधिवेशन बोलविले असून जरांगे-पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत आहे. यातून सकारात्मक निर्णय होईल.मराठा समाजाला आरक्षणाचा ‘शब्द’ दिला आहे, तो पाळणारच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला.मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांची कोल्हापुरातील सर्किट हाऊसवर बैठक झाली. या बैठकीतील चर्चेचा तपशील समन्वयक योगेश केदार यांनी माध्यमांना सांगितला. केदार म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी आरक्षण, मागसवर्गीय आयोगाचा अहवाल व जरांगे-पाटील यांचे उपोषण या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. जवळपास एक तास सुरू असलेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या मंगळवारी सरकारने विशेष अधिवेशन बोलविले असून त्यात कायदा करण्यात येईल. जरांगे-पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत असून सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे केदार म्हणाले. www.konkantoday.com