पुस्तकांचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे २० एप्रिल रोजी उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दर्शवत वाचन चळवळीत सहभागी होण्याचे नमिता कीर यांचे आवाहनरत्नागिरी : वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने पुस्तकांचे गाव हा उपक्रम सुरू केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केले.

महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या ‘पुस्तकांचे गाव मालगुंड’ या उपक्रमाचा आणि कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवारी (२० एप्रिल) महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कवी केशवसुत स्मारक मालगुंड या ठिकाणी होणार आहे. या साहित्याच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले आहे.

त्या पुस्तकांचे गाव – मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात आज (१८ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. आनंद शेलार उपस्थित होते.याविषयी अधिक देताना श्रीमती कीर पुढे म्हणाल्या की, “सन २०१७ पासून वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने पुस्तकाचे गाव हा उपक्रम राबविण्यास सुरू केला आहे. तेव्हापासून आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक मराठी कवितेचे जनक असलेले कवी केशवसुत यांच्या जन्मगावास पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

कारण साहित्य क्षेत्रात मालगुंड गावाला खूप मानाचे स्थान आहे. कविश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मालगुंड ही आधुनिक कवितेची राजधानी असून कवी केशवसुत स्मारक हे साहित्याची पंढरी असल्याचे सांगितले होते. अनेक साहित्यिकांनी या स्मारकाचे कौतुक केले होते. या सर्व बाबींचा विचार करून शासन दरबारी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नाला महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मराठी भाषा व उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत साहेब यांच्या पुढाकाराने यश मिळाले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गाव हे पुस्तकाचे गाव झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.”यावेळी त्यांनी या पुस्तकाच्या गावाची पूर्ण संकल्पना सादर करून यामुळे पर्यटकांना मिळणारा वाचनाचा फायदा, या भागात वाढणारे पर्यटन आणि त्याद्वारे होणारे अर्थार्जन याबाबत माहिती दिली.

तसेच या संकल्पनेचे कामकाज कसे असणार याबाबतही माहिती देऊन हा उपक्रम मालगुंड गावात राबविला जात असल्याने खूप आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच रचना, कार्यवाही याबाबत माहिती देत या लोकार्पण सोहळा हा समस्त रत्नागिरी जिल्हावासीयांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून सर्वांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सांगितले की, पुस्तकाचे गाव हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असून महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री व उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्यामुळेच हा उपक्रम पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार जर अत्यंत सकारात्मक असेल तर आपण सर्वांनी मिळून यात सहभागी होणे ही जबाबदारी आहे असे मत मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button