डीजेच्या आवाजाची तक्रार केली म्हणून, सरपंचासह 10 जणांनी महिला वकिलाला बेदम मारलं; पाईपच्या माराने अंग पडलं काळनिळं!

अंबाजोगाई : ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्याच्या मागणीची तक्रार केल्याच्या कारणावरून संतापलेल्या गावच्या सरपंचासह दहा जणांनी गावातील एका महिला वकिलास बेदम मारहाण केल्याची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सनगाव (ता. अंबाजोगाई) येथे घडली आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲड. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान (वय ३६) या महिला वकिलाने सनगाव गावात ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात यासंबंधी तक्रारी दिल्या होत्या.

*याचा राग मनात धरून सनगावचे सरपंचासह दहा जणांनी ॲड. ज्ञानेश्वरी अंजान या त्यांच्या शेतातील अंबराईत कैऱ्या आणण्यासाठी आद्रकीच्या शेतातील बांधाजवळ गेल्या असता अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ व नवनाथ ज्ञानोबा जाधव (सर्व रा. सनगाव ता. अंबाजोगाई) यांनी त्यांच्या हातात काळा रबरी पाईप घेऊन तर, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान व सुधीर राजाभाऊ मुंडे हे हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांच्या जवळ आले व तू यापूर्वी गावातील पिठाच्या गिरण्या, मंदिरावरील भोंग्याच्या तक्रारी का दिल्यास, तुझ्या आईचा कोर्टात सुरु असलेली ३०७ ची केस का काढून घेत नाहीस, तू यापुढे आमच्या विरोधात तक्रार देशील का? असे म्हणून गोलाकार रिंगण करत त्यांच्या हातातील काठ्या व रबरी पाईपने वकील महिलेच्या पाठीवर, मानेवर, कमरेवर, दोन्ही पायाच्या पाठीमागे व पार्श्वभागावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

वाईट हेतूने ज्ञानेश्वरीच्या हाताला धरुन अंगाशी केली झोंबाझोंबी*यावेळी अनंत अंजान व राजकुमार मुंडे यांनी वाईट हेतूने तिच्या हाताला धरुन अंगास झोंबाझोंबी करून विनयभंग केला. तर, नवनाथ दगडू मोरे याने तिला खल्लास करून टाका असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ‌ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे व नवनाथ दगडु मोरे या दहा जणांविरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एका पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button