२१ कोटींचे कोकेन जप्त; परदेशी महिलेला अटक!

*मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत परदेशी महिलेला अटक करण्यात आली. तिच्याकडून २१७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २१ कोटी रुपये आहे. महिलेकडून तीन पाकिटे जप्त करण्यात आली असून त्यात कोकेन सापडल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, एक गिनी नागरिक भारतात अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला अडवले. ती केनियातील नैरोबी येथून मुंबईला आली होती. तपासादरम्यान तिला या अमली पदार्थांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र तिने नकार दिला. तिची बॅग तपासली असता त्यात तीन पाकिटे सापडली. त्यात पांढऱ्या रंगाची पावडर असल्याचे निष्पन्न झाले.डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी फिल्ड किट आणून तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्या पाकिटांमध्ये मिळून एकूण २१७८ ग्रॅम कोकेन होते. त्याची किंमत २१ कोटी ७८ लाख रुपये आहे, असे डीआरआयने सांगितले.

अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अंतर्गत कोकेन जप्त करण्यात आले आणि सदर विदेशी महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत डीआरआय तपास करीत आहेत. तिच्याकडून एक व्यक्ती अमली पदार्थ स्वीकारणार होता. पण त्यापूर्वीच तिला अटक झाली. महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनचा साठा अधिक असून दाखल गुन्हा सिद्ध झाल्यास महिलेला २० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.मुंबई व दिल्लीत येणारा हेरॉइन व कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू घरातील तरूण-तरूणींमध्ये कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रिकी देशांतून कोकेनची सर्वाधिक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे.

कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमधील नागरिकांचा वापर करण्यात येत होता. पण सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर होत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई आणि मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन येते. साओ पावलो येथूनही मोठ्या प्रमाणत कोकेनची तस्करी होते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी हे तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button