
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मडूरा बाबरवाडी येथे महावितरण कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काजू बागेला भिषण आग! ५०० हून अधिक कलमे जळून खाक!!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सावंतवाडी तालुक्यातील मडूरा बाबरवाडी येथील डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत सुमारे ५०० हून अधिक काजू कलमे, आंबा, नारळाची रोपे जळून खाक झालीत. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांती तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.आग विझविताना नेत्रा नाईक या गंभीर जखमी झाल्या. महावितरण कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सदर आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सदर आग बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली.या दुर्घटनेत पुंडलिक धुरी, नेत्रा नाईक, राधाबाई नाईक या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी प्रकाश वालावलकर, सागर धुरी, लक्ष्मण नाईक, सुवर्णा धुरी, सान्वी धुरी, रमाकांत धुरी, अशोक धुरी, दीप्तेश धुरी, भरत परब, नेत्रा नाईक, पुंडलिक धुरी, अस्मिता धुरी, अर्चना धुरी, मधुकर धुरी, अभिमन्यू धुरी आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतली.आगीची माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी न आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविताना नेत्रा नाईक या आगीत अडकल्या व जखमी झाल्या. स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत प्रकाश वालावलकर यांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या झाडांमध्ये अडकल्या आहेत. त्यांची साफसफाई केली जात नाही. कर्मचारी लाईन मधील तांत्रिक बिघाड न शोधता केवळ फ्यूज मजबूत घालतात. त्यामुळे वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत असा आरोप केला.