
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलावरील पहिला स्लॅब आठवडाभरात.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दीर्घकाळ रखडलेला चिपळूणचा उड्डाणपूल डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या वेगाने काम सुरू आहे. चार पिलरवर गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाले असून आणखी ८ पिलरवर गर्डर चढवल्यानंतर पुलावर एकूण २४० मीटरचा पहिला कॉंक्रीटचा स्लॅब पुढील आठवडाभरात पडणार आहे. पावसाळ्यापूर्वी अर्धा पूल स्लॅबसहीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.चौपदरीकरणात पेढे परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरच्या चिपळूण टप्प्यात बहाद्दूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत १,८४० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम ५ वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. परिणामी चौकशी समितीच्या अहवालानंतर पुलाचा आराखडा बदलण्यात आला.www.konkantoday.com