
हातिवले टोलनाक्यावर शिवसैनिक धडकले
राजापूर : तालुक्यातील हातिवले येथे सुरू होत असलेल्या टोलनाक्यावर नोकरीत स्थानिक तरूण-तरुणींना प्राधान्य द्यावे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी करावी, याकरिता सोमवारी शिवसेना पदाधिकार्यांनी टोलनाक्यावर धडक देत संबंधित अधिकार्यांना निवेदन दिले.
मुंबई-गोवा महामार्गाचे राजापूर तालुक्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. लवकरच त्या ठिकाणी टोल आकारणी सुरू होणार असून त्याकरिता कामगारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत माहिती मिळताच खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या आदेशानुसार सोमवारी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी टोलनाक्यावर धडक देत तेथील अधिकार्यांशी चर्चा केली.
टोलनाक्यावर कर्मचारी भरती करताना स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच 20 किलोमीटरच्या अंतरातील गाड्यांना सवलतीचा पास देण्याऐवजी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या गाड्यांवर एमएच 08 नंबर असेल अशा सर्व गाड्यांना फ्री पास देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन एमडीके कंपनीचे सचिन पडवळ यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकापमुख रामचंद्र सरवणकर, विभाग प्रमुख कमलाकर कदम, नरेश दुधवडकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, उप विभाग प्रमुख बाळू हर्याण, प्रसाद मोहरकर, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, सरपंच सायली धालवलकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.