भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस कडूनही प्रवक्त्यांची फौज!

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता प्रवक्त्यांची भलीमोठी यादी तयार केली असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने नेते व प्रवक्त्यांची १५ जणांची फौज तयार केली आहे. परिणामी भाजप आणि काँग्रेसमध्ये आता वाकयुद्ध बघायला मिळणार आहे.सत्ताधारी पक्षाकडून खोटे कथानक तयार करून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. भाजपचा माहिती तंत्रज्ञान विभाग विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, चित्रफिती खाडाखोड करून किंवा त्यात बदल करून समाज माध्यमांमधून प्रसारित करीत आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी १५ नेत्यांकडे जबाबदारी सोपविल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा या १५ नेत्यांकडे जबाबदारी सोपावण्यात आली आहे. हे नेते पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमाशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत मांडणार आहेत. समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button