
भास्कर जाधवांनी जाहिरपणे मागितली अध्यक्षांची माफी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या विधानांचे जोरदार पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. त्यांनी सभागृहासह मीडियाशी बोलतानाही त्यांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषा, हावभाव केल्याचा आरोप तीन मंत्र्यांनी आज केले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर जाधवांनी चुकीची कबुली देत माफी मागितली आहे.
शिवसेना नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे सभागृहामध्ये उपस्थित असताना आदित्य ठाकरे यांनी वादग्रस्त विधाने, हातवारे केल्याचा आरोप देसाईंनी केला. तर जाधव आणि ठाकरेंनी मीडियाशी बोलताना अध्यक्षांबाबत अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी देसाईंनी अध्यक्षांकडे केली.मंत्री दादा भूसे यांनीही दोन्ही नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अजून काही जणांचे दुधाचे दात पडले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी हातवारे, भाषा अश्लील होती, अशी टीकाही त्यांनी केली. मत्री आशिष शेलार यांनीही दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून अशी वागणूक अपेक्षित नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भास्कर जाधव यांनी माफी मागून यावर पडदा टाकण्याची विनंतीही त्यांनी केली.मंत्र्यांच्या निवेदनानंतर भास्कर जाधव यांनीही काल झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली. सभागृहात मी जे काही बोललो, त्याविषयी काय शिक्षा करायची ती तुम्ही करावी, असे जाधव म्हणाले. तर मीडियाशी बोलताना अध्यक्षांविषयी मी जे बोललो, ते बोलायला नको होते, असे सांगत त्यांनी आपली चूक झाल्याची कबुली दिली.मी जे काही बोललो ते घरी जाऊन पाहिले. त्यावेळी मला माझी चूक कळाल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे मी त्याबाबत माफी मागतो आणि दिलगिरीही व्यक्त करतो. तसेच त्यानंतरही अध्यक्षांना माझ्यावर काही कारवाई करायची असेल तर करावी, मी ती मान्य करेन, असेही जाधव म्हणाले. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनीही जाधव यांनी मांडलेली भूमिका सभागृहाने मान्य करून पुढे जावे, अशी विनंती सभागृहाला केली आणि वादावर पडदा टाकला.