अन्यथा पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल : प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडेचा इशारा.

नांदिवडे येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा

. रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून अंबूवाडीफाटा, नांदीवडे या ठिकाणी उभे राहत असलेल्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध असून प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंपनी अधिकारी, पोलिस आणि ग्रामस्थ यांच्या काल (१५ एप्रिल) एकत्रित झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेवरून ग्रामस्थांनी काही मागण्या समोर ठेवल्या आहेत. या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही अथवा या निर्णयामळे समाधानकारक निर्णय मिळाला नाही, तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल, असा इशारा नांदिवडे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन स्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुका प्रमुख तथा शहर संघटक प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख सुभाष रहाटे, विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, संतोष हळदणकर, सज्जन लाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.तालुक्यातील जयगड येथील जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून अंबूवाडीफाटा, नांदीवडे या ठिकाणी उभे राहत असलेल्या गॅस टर्मिनलमुळे परिसर प्रभावित होऊ शकतो त्यामुळे हा प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतरीत करावा, या मागणीसाठी नांदीवडे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थ १४ एप्रिलपासून गॅस टर्मिनल शेजारी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवला असून समितीने केलेल्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून आज (१६ एप्रिल) दुपारपर्यंत कंपनीने लेखी पत्र संघर्ष समितीच्या नावाने आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये आंदोलनस्थळी द्यावे, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी त्यांच्या दालनामध्ये कंपनी अधिकारी व शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. तसेच १५ एप्रिल रोजी जयगड पोलीस स्टेशनमधील एपीआय कुलदीप पाटील व रत्नागिरी तालुका तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कंपनीचे ऑपरेशन हेड समीर गायकवाड यांना आंदोलन स्थळी बोलावून घेऊन आंदोलकांसमवेत चर्चा घडवून आणली. या दरम्याने जी काही चर्चा झाली त्या चर्चेवरून आम्ही या परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या आपणासमोर ठेवत आहोत.

या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. या निर्णयामळे आम्हाला जर समाधानकारक निर्णय मिळाला नाही, तर पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या याप्रमाणे : चालू असलेल्या गॅस टर्मिनलचे काम तात्काळ थांबवावे, हे गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरीत करावे, एनर्जी प्लांटच्या माध्यमातून साठवणूक करत असलेल्या राखेचा त्रास स्थनिक नागरिकांना होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुनर्जीवित व शाश्वत करावे, कंपनीच्या माध्यमातून निर्माण झालेले उर्जा हॉस्पिटल अद्ययावत करून परिसरातील नागरिकांना मोफत उपचार द्यावे, निवळी-जयगड रोडवरील कंपनीची बंद पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सु-नियोजित करण्यासाठी २४ तास एक क्रेन उपलब्ध ठेवणे, रोजगाराच्या दृष्टीकोनातून स्थानिक मुलांना टेक्निकल ट्रेनिंग उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, व्यावसायिक दृष्टिकोनातून येथील तरुणांना प्राधान्य देणे, सीएसआर डिपार्टमेंटमध्ये स्थानिक मुलांची नेमणूक करणे वर नमूद केलेल्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून आज (१६ एप्रिल) दुपारपर्यंत आपले लेखी पत्र संघर्ष समितीच्या नावाने आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये आंदोलनस्थळी मिळावे. दरम्यान, आपण चांगले प्रकल्प याठिकाणी आणावे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे, ही सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहील हा विश्वासही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button