
शिवसेनेचे खा. रवींद्र वायकर यांनी प्रथमच नवी दिल्ली येथे आंबा महोत्सव आयोजित केला, पंतप्रधानही राहणार उपस्थित
नवी दिल्ली येथे नवीन महाराष्ट्र सदनात 30 एप्रिलला आंबा महोत्सव होणार आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील हापूस आंबा दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील 5 आंबा बागायतदार सहभागी होणार असून तब्बल 1 हजार डझन पिकलेल्या आंब्यांचा समावेश असणार असल्याची माहिती कोकण आंबा उत्पादन संघाचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी या आंबा महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे खा. रवींद्र वायकर यांनी प्रथमच नवी दिल्ली येथे आंबा महोत्सव आयोजित केला आहे.हापूस आंब्याचे राष्ट्रीयस्तरावर मार्केटिंग व्हावे, अस्सल हापूस आंबा ग्राहकांना उपलब्ध व्हावा, या हेतूने महाराष्ट्र सदनमध्ये हा आंबा महोत्सव होणार आहे.
यासाठी कोकणात उत्पादित दर्जेदार व सेंद्रिय तसेच जीआय मानांकन असलेला हापूस उपलब्ध केला जाणार आहे. या माध्यमातून कोकणातील जीआय नोंदणीकृत आंबा बागायतदारांना त्यांच्या आंब्यासाठी चांगला दर मिळणार आहे. स्थानिक कृषी अधिकार्यांच्या माध्यमातून अस्सल हापूस आंबा या महोत्सवासाठी पाठविला जाणार आहे. या आंबा महोत्सवास उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे. यामुळे आयोजक व आंबा उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी अलिकडेच हापूस आंब्यातील भेसळ रोखण्यासाठी युनिक नंबर टॅग ही आधुनिक तंत्रज्ञान युक्त पद्धत अंमलात आणली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील आंबा महोत्सवामुळे देशभरातील ग्राहकांना अस्सल हापूस आंब्याची ओळख होणार आहे.