
महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपयेच मिळणार
लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात.विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळणार या प्रतिक्षेत असताना लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. यामुळे 8 लाख लाभार्थी महिलांना धक्का बसणार आहे. कारण या अपडेटनुसार 8 लाख महिलांचे मासिक स्टायपेंड कमी करण्यात आले आहे. यानंतर महिलांमध्ये चिंतेचे वातवरण असून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतोय. राज्यातील अशा महिलांची आकडेवारी साधारण 8 लाख इतकी आहे. अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये मासिक मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. पण त्यांचा एकूण मासिक लाभ 1 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.