‘फातिमा शेख’ नामक व्यक्तीचा फुले चरित्रात उल्लेख नाही शाळांमध्ये प्रतिमा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य झाकोळू नये संविधान सन्मान मंचाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

रत्नागिरी | : ‘फातिमा शेख’ नामक व्यक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या सोबत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या म्हणून त्यांचा फोटो जिल्हा परिषद शाळांमधून लावण्याच्या केलेल्या मागणीला रत्नागिरीतील संविधान सन्मान मंचाने विरोध केला असून तसे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘फातिमा शेख’ नामक व्यक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या सोबत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा फोटो जिल्हापरिषद शाळांमध्ये लावण्याबाबत पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले होते. मात्र याला रत्नागिरीच्या संविधान सन्मान मंचाने विरोध केला असून तसे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटल्या प्रमाणे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष व त्याग करून मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य केलेले आहे. सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या असीम त्यागामुळे आजची पिढी आणि विशेषकरून महिलावर्ग अत्यंत अभिमानाने स्वतःला सावित्रीच्या लेकी असे संबोधितात. आम्ही संविधान सन्मान मंचाच्या माध्यमातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर अनेक पुरोगामी आणि सुधारणावादी व्यक्तींच्या कार्याचा आणि त्यांच्या वाङमयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करत असतो.

मात्र महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या लिखाणाचा त्यांच्यावरील साहित्याचा तसेच महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांचे जे साहित्य प्रसिद्ध केले त्यामध्येदेखील ‘फातिमा शेख’ नावाच्या व्यक्तीचा कुठेही उल्लेख आलेला नाही. त्याचप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारसोबत शाळा सुरु करण्यासाठी जे कागदोपत्री व्यवहार केले, त्यातील नमूद केलेल्या शिक्षकांच्या यादीत देखील ‘फातिमा शेख’ यांच्या नावाची नोंद नाही. एवढेच नाही तर ‘फातिमा शेख’ ही महिला फुले दांपत्यांच्या कार्यकाळात विद्यार्थिनी, शिक्षिका किंवा सहकारी म्हणून असल्याची कुठेही नोंद उपलब्ध नाही. एकंदरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे कर्तृत्व कमी करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक खोटा विमर्श प्रस्थापित करून खोटा व चुकीचा इतिहास शाळेतील मुलांच्या बालमनावर ठसवण्याचा हा एक अत्यंत हिणकस प्रकार आहे.

अश्या प्रकारे यदाकादाचीत तथाकथित ‘फातिमा शेख’ नामक व्यक्तीचा फोटो लावला गेल्यास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे कार्यकर्तृत्व झाकोळून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार आहे. अश्या स्वरूपाच्या कृतींमुळे थोर व्यक्तींच्या शुद्धहेतूने केलेल्या समाजसेवेचा आणि राष्ट्रसेवेचा विपर्यास करून राजकीय फायदा करण्याच्या दृष्टीने काहीतरी वेगळेच रूप धारण करून बसेल असे निवेदनात म्हणण्यात आले आहे. हे निवेदन यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे याना देण्यात आले. यावेळी संविधान सन्मान मंचाच्या वतीने अनघा शिरीष जैतपाळ, पूजा चंद्रकांत अपकरे, अंजुम अनंत सावंत, संध्या संदेश जाधव, प्रेरणा प्रदीप मोहिते, नितीन सुरेश भुजबळराव, समीर भास्कर खातू, ऍड सोनाली स्नेहराज साळुंखे आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button