
दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दोन गटांमध्ये निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटात राडा
दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दोन गटांमध्ये निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटात राडा झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जनार्दन चोगले, अनिल गोपाळ चोगले, जितेंद्र सखाराम चोगले, विष्णू बाळ्या तबीब, वामन चाया चोगले आणि किसन जनार्दन चोगले (सर्व रा. पाजपंढरी शेतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाजपंढरीतील शेतवाडी मंडळाचे अध्यक्ष गणेश जनार्दन चोगले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वाडीतील सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत गणेश चोगले यांनी उपस्थितांना विशिष्ट पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यावेळी नीलकंठ हिऱ्या रघुवीर यांनी आपण दुसऱ्या व्यक्तीला मतदान करणार असल्याचे सांगितले.
तक्रारीनुसार, त्यावेळी त्यांना कोणीही विरोध केला नाही.दरम्यान, ८ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता शेतवाडी मंडळाची सर्वसाधारण सभा चंद्रकांत रामा रघुवीर यांच्या घरासमोर झाली. या सभेत अध्यक्ष गणेश चोगले यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर चर्चा सुरू केली. मतदानाच्या आकडेवारीवरून बाचाबाची झाली आणि गणेश चोगले यांनी नीलकंठ रघुवीर यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
नीलकंठ रघुवीर यांचे भाऊ त्यांना वाचवण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच, ‘तुम्ही गावात राहायचे नाही, जर तुम्ही ऐकले नाही तर तुम्हाला ठार मारून समुद्रात फेकून देऊ’ अशी धमकी दिल्याची तक्रार नीलकंठ रघुवीर यांनी पोलिसांत दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला