
गोगटे-जोगळेकर महाविद्याल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
रत्नागिरी : बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेला हादरे दिले, बाबासाहेबांनी मांडलेली लोकशाही समता, स्वातंत्र्य, न्यायावर उभी आहे. पण यापूर्वीसुद्धा आणि गेल्या १०- १५ वर्षांत राजकीय पक्ष, नेत्यांकडून जातीय अस्मिता टोकदार करण्याचे काम झाले. निवडणुकीत जात आणली जाते, आरक्षणाचे गाजर दाखवले जाते. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका नाहीत स्वातंत्र्यपूर्व काळात वरच्या जाती माध्यमातून खालच्या जातीवर अन्याय अशी स्थिती होती. आंबेडकरांच्या राज्य घटनेतून याला आळा घालणे शक्य झाले असे प्रतिपादन पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रकाश पवार यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
मंचावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी व कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. गोसावी, उपस्थित होते. प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी डॉ. सीमा कदम यांच्या सीमा या लेखसंग्रहाचे प्रकाशन तसेच भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांनी केले.प्रा. पवार म्हणाले की, बाबासाहेबांची जयंती जगभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब हे संविधान निर्माते व लोकशाहीचे प्रणेते आहेत. लोकशाहीचा शेवटचा घटक दलित, आदिवासी आहे. बाबासाहेबांनी संविधान दिले. भारतात वंशवाद, जात, स्त्री पुरुष भेद दिसतो. त्याला बाबासाहेबांनी विरोध केला. त्यामुळेच लोकशाहीमध्ये जातीव्यवस्थेला नाकारले आहे. बाबासाहेबांनी सामाजिक, आर्थिक लोकशाहीचा आग्रह धरला. आपण राजकीय लोकशाही स्वीकारली, परंतु सामाजिक, आर्थिक लोकशाही येत नाही तोपर्यंत लोकशाहीला अर्थ राहणार नाही. अन्यथा भीषण स्थिती भारतात उभी राहू शकते. स्वातंत्र्य चळवळीतील लोकांना आत्मभान होते. तिसऱ्या पिढीला लोकशाहीचे काही पडलेले नाही. अनेकांनी यावर टिका केली आहे. लोकशाहीचा ढाचा हा संविधानावर आधारलेला आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेबांची जयंती, पुण्यतिथी अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांनी साजरी केली जात असल्याचे सांगितले.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे- वरिष्ठ महाविद्यालय- प्रथम- सेजल मेस्त्री, द्वितीय ओंकार आठवले, तृतीय आर्या चव्हाण, उत्तेजनार्थ- स्मार्था कीर, पूर्वा कदम, मिताली सावंतदेसाई. कनिष्ठ महाविद्यालय- प्रथम- तृप्ती तांडेचिरकर, द्वितीय श्रेया पवार, तृतीय तनिष्का मुटगर, उत्तेजनार्थ- मलीहा भाटकर, सिमरन मुल्ला, तन्वी भाताडे. स्पर्धेसाठी प्रा. सचिन सनगरे, प्रा. नीलेश पाटील, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. दिलीप सरदेसाई, प्रा. विस्मया कुलकर्णी, प्रा. मनस्वी लांजेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.