
अध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठीपंढरपूर ते लंडन दिंडी; ७० दिवस अन् २२ देशांमधून होणार प्रवास
वारकरी संप्रदाय, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेला आध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काढण्यात आली आहे.मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन येथे स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी या आंतरराष्ट्रीय वारीचे आयोजन केले आहे. ब्रिटन येथील मराठी मंडळाच्या वतीने लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे.
त्यापूर्वी या मंडळाने पंढरपूर ते लंडन अशी १८ हजार किलोमीटरची दिंडी काढली आहे. एकूण ७० दिवसांचा व २२ देशांमधून प्रवास करत या पादुका एका विशेष मोटारीने लंडनमध्ये २१ जून रोजी पोहोचणार आहेत.लंडन दिंडीचे प्रमुख अनिल खेडकर म्हणाले, लंडन वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वारीची आणि संत परंपरेची महती आता जगभरात पोहोचणार आहे. काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर उभा केले जाणार आहे. गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे.
अमेरिका, युरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर नाही. यासाठी वारी सातासमुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा, ही प्रामाणिक इच्छा आहे. दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात. पण समर्पण भावनेने गाडीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन खंडांतून प्रवास
या दिंडीसाठी सर्व देशांचा व्हिसा, वाहनांचे परमीट व इतर आनुषंगिक कायदेशीर तयारी पूर्ण केली आहे. दिंडी १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा २२ देशातून व दोन खंडातून ७० दिवसांचा प्रवास करत २१ जून रोजी लंडनमध्ये पोचणार आहे.
दिंडी प्रस्थान वेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे आदी उपस्थित होते.