समाज एकता मनसे चषक २०२५ स्पर्धेत मनसेच्या व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव यांची विनोदी शैलीत फटकेबाजी.

आबलोली : “महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने “एक समाज एक संघ” समाज एकता मनसे चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेचे आयोजक, माझे तरुण सहकारी प्रमोद गांधी यांचे मी कौतुक करायला आलो आहे. चांगल्या उपक्रमांचे कौतुक करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे आणि चांगले काम करता ते अधिक तुमच्या हातून चांगले व्हावे यासाठी. तुम्हा सर्वांना वेळप्रसंगी मदत करणे हे आपले काम आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे.

माझा सत्कार करताना प्रमोद गांधी यांनी माझ्यावर छत्री धरली आणि मी छत्रीखाली गेलो. कोण कुणाच्या छताखाली गेले याला महत्त्व नाही. त्यांनी छत्री धरल्याने मीच त्यांच्या छत्रीखाली गेलो. त्यामुळे आता किती ऊन, पाऊस आणि किती वादळे आली तरी प्रमोद गांधी आता मला कसलीच चिंता नाही,” अशा विनोदी शैलीत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मनसेच्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना विनोदाच्या चौकार आणि षटकारांची फटकेबाजी केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की, “मला विशेष करून प्रमोद गांधीना धन्यवाद दिले पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे जो उपक्रम आदर्श आहे, एक नाविन्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कल्पकता आहे. त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या; पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिले “एक समाज एक संघ” अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नवीन कल्पकता सर्वांसमोर याठिकाणी आणली आणि म्हणून मी प्रमोद गांधी यांचे कौतुक मनापासून करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो.””या स्पर्धेत त्यांनी १२ समाजाच्या १२ संघाना संधी दिली; पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातील कोणा एका विशिष्ट समाजाचीच स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानात संपूर्ण समाजाला संधी निर्माण करून दिली हा त्यांचा अतिशय आगळा वेगळा उपक्रम आहे, कौतुकास्पद उपक्रम आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो त्याच वेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे आणि चांगल काम करता ते अधिक तुमच्या हातून चांगले व्हावे म्हणून तुम्हा सर्वांना वाटेल त्या वेळेला प्रसंगी मदत करणे हे आपले काम आहे, म्हणून मी या ठिकाणी तुमचे कौतुक करायला आलो आहे,” असे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी मनसेचे गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी आमदार जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि मनसेची छत्री भेट देऊन सत्कार केला. तर मनसेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते आमदार जाधव यांचे स्वयंसहाय्यक संतोष तांदळे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि मनसेची छत्री भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश (दादा) सावंत, माजी सभापती सुनील पवार, मराठा समाजाचे गुहागर तालुका अध्यक्ष भगवानराव कदम, सरपंच विजय तेलगडे, साबीर साल्हे, उपसरपंच आसिम साल्हे, पिंट्या संसारे, मामा शिर्के, सचिन जाधव, ममताजभाई ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button