
माजी खासदार विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून लोक म्हणतात त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे-शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी प्रवक्त्या संजना घाडी
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.संजना घाडी यांना काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या प्रवक्ते पदावरून हटविण्यात आले होते. २०२२ साली शिवसेनेत फूट पडल्यानंतरही घाडी दाम्पत्य ठाकरे गटाबरोबर कायम होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचारही केला होता. मात्र आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.संजना घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश करत असताना माध्यमांशी संवाद साधला आणि या निर्णयामागची पार्श्वभूमी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘विधानसभा निवडणुकीवेळी संजना घाडी यांना मागाठाणे विधानसभेसाठी उमेदवारी मिळेल, अशी आवई उठविण्यात आली होती. त्यामुळे मातोश्रीच्या जवळचे नेते इतके सावध झाले की, त्यांनी आम्हाला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. उमेदवारी नाकारली त्याशिवाय माझे प्रवक्ते पद आणि सोलापूरचे संपर्क प्रमुख पदही काढून घेतले. जे लोक अडचणीच्या काळात शिवसेनेबरोबर (ठाकरे) कायम होते, त्यांनाच बाजूला करण्याचा कट रचला जात आहे.’यावेळी संजना घाडी यांनी विनायक राऊत यांच्यावर जहरी टीका केली. माजी खासदार विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून लोक म्हणतात त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे. राऊत यांचा पक्षसंघटनेत हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे संघटनेचे नुकसान होत आहे, हे पक्षश्रेष्ठींनी पाहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.माजी नगरसेवक संजय घाडी यांनीही विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्याकडून खरा धोका आहे. ते स्वतःतर लोकसभेला पडलेच. पण त्यांनी कोकणातही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.’