
दापोलीत सेल्फी पॉइंट व उद्यानाचे ना. योगेश कदम यांच्या हस्ते होणार लोकार्पण.
दापोलीः- दापोली शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या माझं दापोली या सेल्फी पॉइंर्टचे व ओपन जीम आणि गार्डनचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते आज दि. १४एप्रिल रोजी दु. ०३ वाजता स्टेट बँक दापोली समोर दापोली जालगाव रस्त्यानजीक होणार आहे. दापोली शहरामध्ये असणाऱ्या एकमेव अशा साने गुरूजी बालोद्यान ची दुरावस्था ही बातमी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यानंतर गेली अनेक महिने रखडलेल्या या गार्डनचे उद्घाटन होत असल्याने बच्चेकंपनीतून आनंद व्यक्त केला जात आहे.
दापोली शहराच्या मध्यवर्ती अशा दापोली दाभोळ रस्त्यावर स्टेट बँक समोर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या संकल्पनेतून सुमारे २ कोटी आणि एमपी थेटरसाठी २५ लाख असा खर्च करून माझं दापोली हा सेल्फी पॉईंट, सुसज्ज अशी ओपन जीम, नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी असलेले एक उद्यान उभारण्यात आले आहे. हे उद्यान उभारताना वेळोवेळी ना. योगेश कदम यांनी या कामाची पाहणी केली असून वेळोवेळी सुचना देखील केल्या आहेत. दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या उद्यानामुळे दापोलीच्या वैभवात निश्चितच भर पडणार असून के ळसकर नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व त्यानंतर सुसज्ज असे उद्यान उभारल्यामुळे ना. योगेश कदम यांच्या कामाबद्दल दापोलीकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.