
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा 26 एप्रिल रोजी मासिक स्नेह मेळावा. देहदान आणि नेत्रदानाविषयी मार्गदर्शन केले जाणार
*रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ आणि कुवारबाव परिसर महिला ज्येष्ठ नागरिक संघाचा एप्रिलचा संयुक्त मासिक स्नेह मेळावा संघाच्या ज्येष्ठ नागरिक भवनात शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे. यावेळी एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सभासदांचे सत्कार करण्यात येतील. त्यानंतर रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाज सेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव हे ज्येष्ठाना नेत्रदान आणि देहदान विषयी माहिती देणार आहेत. आता देहदान करण्यासाठी डेरवण येथे जाण्याची गरज नाही. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयव दान करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.
हे श्रेष्ठदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नोंदणी कशी करावी आणि नेत्रदान आणि देहदान करण्यासंबंधीची कार्यपद्धती कशी असते, याची माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे. याबाबत शंका निरसन करण्यात येणार आहे. तरी ज्येष्ठांनी या स्नेह मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी केले आहे.