
अजितदादांचा ठाकरेंना धक्का, रायगडच्या हुकमी एक्क्याने मशाल सोडली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेनंतर राजकीय धक्के बसत आहे. विशेषकरून कोकणातून दिग्गज नेते ठाकरेंची साथ सोडत आहेत. रायगडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय. शेडगे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी रोहा येथील राम मारुती चौकात झालेल्या जाहीर सभेत शेडगे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती.