
मला अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील कथित वादाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा आहे. या चर्चेवरुन पत्रकारांनी थेट अजित पवारांनाच सवाल केला असता त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये पत्रकारांना या प्रश्नाचं उत्तर दिलं.पत्रकारांनी एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे तक्रार केली असल्याचा संदर्भ देत अजित पवारांना प्रश्न विचारला.
“आमच्या अर्थ खात्याच्या फाइल्स क्लिअर होत नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते,” असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांनी हा प्रश्न ऐकल्यावर प्रतिक्रिया देताना, “मला अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत,” असं उत्तर दिलं.
अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. “आपण काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दिली