प्रवाहाविरुद्ध उभ राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ग्वाही खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपच्या खासदार श्री २०२५ बॉडीबिल्डिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

*रत्नागिरी | : प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून संघटनेला जिल्ह्यात एक नंबर बनवायचे आहे अशी जिद्द ठेवलीत तर रत्नागिरी हा भाजपाचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, यासाठी तुमच्यासोबत मी कायम आहे अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीतील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेने ‘खासदार श्री २०२५ आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री २०२५’ या भव्यदिव्य अशा शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ना. राणे आज रत्नागिरीत आले होते.

स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर लक्ष्मीचौक मैदान, गाडीतळ रत्नागिरी येथे शनिवारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यावेळी ना. राणे म्हणाले, खा. राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ही भव्य अशी ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेले आहे. गेले चार दिवस जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम या निमित्ताने झाले असून यामुळे चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ आणि प्रामुख्याने हिंदू समाजासोबत उभ राहण्यासाठी इथे आलो आहे. पक्ष म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार राणे साहेब या आपल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे फार मोठं काम उभं करायचं आहे आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रमावर आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहील. यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आपल्या पक्षाचे काम इथे उभं करायचे असून ती जबाबदारी आपल्या प्रमुख नेत्यांनी मला दिली आहे.

या जिल्ह्याच्या संपर्क मंत्री बनवण्याच्या मागेही हाच उद्देश आपल्या नेत्यांचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्याला रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळाले पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, जिल्हा नियोजन पासून ते विशेष कार्यकारी पदापर्यंत प्रत्येक पदांमध्ये भाजपचे स्थान इथे आता दिसणार आहे. इथे आपण संख्येने कमी आहोत ही भावना आता कार्यकर्त्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे, इस्लामिक ताकदीविरुद्ध लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनीही मावळ्यांची संख्या पाहिली नाही, मावळे मोजके होते पण इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, आपल्या धर्माबद्दल निष्ठा महत्त्वाची आहे आणि महाराजांपासून प्रेरणा घेत जर आपण आपली संघटना प्रवाहाच्या विरुध्द उभी करायची जिद्द बाळगली तर आपल्याला काहीही अशक्य नाही असा आत्मविश्वास ना. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपा, शहर भाजपा आणि बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने ना. राणे यांचा सत्कार करण्यात आला.

तर कार्यक्रम स्थळी आल्यानंतर ना. राणे यांनी गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सतेज नलावडे, मुन्ना चावंडे, सचिन करमरकर, राजन फाळके, राजू तोडणकर, दादा दळी, संदीप नाचणकर, सुशांत पाटकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. भाऊ शेट्ये, विक्रम जैन, दादा ढेकणे, अमित विलणकर, ऋषी केळकर, उमेश कुलकर्णी, अशोक वाडेकर, उमेश देसाई, मंदार खंडकर, मंदार मयेकर, रामदास राणे, राकेश साळवी, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ, स्नेहा चव्हाण, राधा हेळेकर, सायली बेर्डे, निलेश आखाडे, राजू भाटलेकर, नितीन जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button