
दहा कोटींहून अधिक निधी खर्च करूनही कुंभार्ली घाट अजूनही वाहतुकीला धोकादायक.
* कुंभार्ली घाटातील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील पाच वर्षात दहा कोटींहून अधिक निधी खर्च केला. तरीही अपघात कमी झालेले नाहीत. अवघड वळणे, तीव्र उतार असलेल्या कुंभार्ली घाटांमधील सुरक्षेच्या उपाययोजना तकलादू ठरत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. घाटातील धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे उभे करण्याची गरज असतानाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट अतिशय धोकादायक बनलेला आहे. या घाटात वाहने दरीत कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात येथे दोन वाहने दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला होता. किरकोळ अपघात हे नेहमीचे झालेले आहेत. चिपळूणमधून जाताना तीव्र चढ आणि कराडहून येताना हा घाट तीव्र उताराचा आहे. घाटातून कराडकडे जाताना अपघाताचा फारसा धोका संभवत नाही; मात्र, कराडहून येताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याचा धोका संभवतो. घाट उतरताना वाहनांचे गंभीर अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. घाटातील संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत तसेच काही ठिकाणी कठडेच नाहीत. त्यामुळे भरधाव वाहने दरीत कोसळतात.घाटातील सुरक्षेच्या तोकड्या उपाययोजना अपघाताला कारणीभूत ठरत आहेत