
मुंबईतील नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा गणपतीचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्याकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपावली.
मुंबईतील नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजा गणपतीचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्याकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपावली आहे. सुधीर साळवी यांची शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.लालबागचा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यातच महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने सुधीर साळवी यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. सुधीर साळवी यांना लालबागचा राजा पावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.लालबागचा राजा गणपतीचे मानद सचिव असल्यामुळे सुधीर साळवी यांनी मोठे वलय निर्माण केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला येतात. तेव्हा सुधीर साळवी हे सगळ्यांचे आदरातिथ्य करताना दिसतात. त्यामुळे सुधीर साळवी यांनी चांगलाच जम बसवला आहे. त्यापार्श्वभूमीवर साळवी हे शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, तेथून अजय चौधरी यांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले.त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड भडकलेले. त्यांनी लालबागमधील कार्यालयासमोर जमून शक्तीप्रदर्शन केले. ऐन विधानसभा निवडणुकीत साळवी हे वेगळा निर्णय घेतील, अशीही चर्चा रंगली होती. पण, ‘मातोश्री’वर बोलावून साळवी यांची समजूत काढण्यात आली होती. साळवी हे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिले. त्याचेच फळ साळवी यांना सचिवपदाच्या निमित्ताने मिळाल्याचे सांगितले जात आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सुधीर साळवी हे गेली 35 वर्षे कार्यकारिणीमध्ये असून 20 वर्षांपासून सातत्याने मंडळाचे मानद सचिव म्हणून यशस्वी नेतृत्व करीत आहेत. तसेच त्यांचे वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान असून ग्लेनईगल्स हॉस्पिटल आणि महर्षी दयानंद कॉलेजचे विश्वस्त म्हणूनदेखील ते काम पाहत आहेत.