मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाचा भाग म्हणून एमएमआरडीएकडून बांधणी!

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मरिन ड्राईव्ह येथे सागरी किनारा मार्ग – एनसीपीएदरम्यान सागरी किनारा मार्गाच्या बाजूने नवीन सहा पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएच्या ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाचा हा एक भाग असणार आहे. दुहेरी बोगदा प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एक आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी रस्त्याच्या बांधणीवर चर्चा झाली.

पूर्वमूक्त मार्गावरून अतिजलद येणाऱ्या आणि पुढे मरिन ड्राईव्हच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही बाब लक्षात घेता एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ६.५ किमी लांबीचा हा दुहेरी बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मरिन ड्राईव्हच्या पुढे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनसीपीए – कफ परेड दरम्यान १.७७ किमी लांबीच्या सागरी पुलाची बांधणी एमएमआरडीए करणार आहे.दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारच्या बैठकीत प्रकल्पाबाबत काही सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार मरिन ड्राईव्ह येथे आणखी एक सहा पदरी समांतर रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर वाहनांना पुढे जाण्यासाठी सागरी किनारा मार्ग – एनसीपीएदरम्यान सागरी किनारा मार्गाच्या बाजूने ३ किमी लांबीचा सहा पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्याचे नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात येणार आहे.

हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास दुहेरी बोगद्यातून पुढे सागरी किनाऱ्याकडे येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारच्या बैठकीत प्रकल्पात वरील सुधारणा सूचवितानाच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. कालबद्ध नियोजन करून हा प्रकल्प मार्गी लावावा, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कालबद्ध नियोजनाअंतर्गत या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शुक्रवारच्या बैठकीत सुचविण्यात आलेल्या सुधारणाविषयी एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button