
‘नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. 12 : अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करावयाचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी तातडीने कारवाईची मोहीम सुरु करावी. कोणाचाही फोन आला तर, त्याची डायरीला नोंद घ्या. असे निर्देश देतानाच, पोलीसांच्या या मोहिमेला प्रसिध्दी माध्यमांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही, नियंत्रण व जनजागृतीबाबत आज आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंमली पदार्थाचा थेट परिणाम युवा पिढीवर होत आहे. हे प्रत्येक गावाचे दु:ख आहे. ग्रामीण भागातील युवक मृत्युमुखी पडत आहेत. पोलीस चांगले काम करीत असतात. या सामाजिक मोहिमेत माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे. अंमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाहीत. आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत, हे दिसून येते. राज्यात अंमली पदार्थ मुक्त आपला रत्नागिरी जिल्हा करु. अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल, अशा पध्दतीने ही मोहीम तीव्र राबवावी.
*विक्रेता आणि वापरकर्ता दोघांवरही कारवाई अंमली पदार्थाचे सेवन करणाराही विक्री करणाऱ्या एवढाच दोषी आहे. अंमली पदार्थ विक्रेता आणि त्याचे सेवन करणारा या दोघांवरही सारखीच कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवन करु नये. त्याची विक्री करणारे तसेच वापर करणारे यांच्याविषयीची माहिती जर, कोणाला असेल तर त्यांची नावे पोलीसांना कळवावीत. कळवणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
*नो कॉम्प्रोमाईझ !* अंमली पदार्थाचे हे लोण कधी तरी आपल्या घरातही पोहचेल. याचे भान पोलीसांसह सर्वांनी ठेवावे. त्यामुळे अंमली पदार्थाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नो कॉम्प्रोमाईझ अशी कठोर भूमिका घ्यावी. अशा आरोपींना पाठीशी घालणारे जर कुणाचेही फोन आले, तर त्याबाबतीत पोलीसांनी धाडस दाखवावे व तशी डायरीला नोंद घ्यावी. अशांची नावे प्रसिध्दी माध्यमांना द्यावीत. पोलीसांनी मनावर घेतल्यानंतर ते कशा पध्दतीने कारवाई करु शकतात, हे या मोहिमेत पोलीसांनी जनतेला दाखवून द्यावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.*31 गुन्ह्यांमध्ये 50 आरोपींवर कारवाई; ७ तडीपार* पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ विरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. 2024 मध्ये एकूण 25 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 39 आरोपींना अटक करण्यात आली. 7 लाख 15 हजार 650 रुपयांचे 231 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 6 लाख 66 हजार 54 रुपये किंमतीचा 32.858.5 किलोग्रॅम गांजा आणि 50 लाख 89 हजार 600 रुपये किंमतीचे 12.720 किलोग्रॅम चरस यात जप्त करण्यात आले आहे. 2025 मध्ये 6 गुन्ह्यांमध्ये 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 2 लाख 26 हजार 250 किंमतीचे 25.4 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 3 लाख 76 हजार 197 रुपयांचा 7.616.5 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. 7 आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावरील पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.