
दख्खनचा राजा जोतिबाच्या आज शनिवारी होणार्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर दाखल
दख्खनचा राजा जोतिबाच्या शनिवारी आज (दि. 12) होणार्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर यात्रेकरूंचे जथ्थे डोंगरावर येत होते.मानाच्या सासनकाठ्यांसह इतर गावांतून सासनकाठ्या घेऊन आलेल्या भाविकांच्या गर्दीने जोतिबा डोंगर फुलून गेला आहे. उद्याच्या यात्रेला दहा लाखांवर भाविक येतील, असा अंदाज आहे.
जोतिबा डोंगरावर दरवर्षी भरणार्या चैत्र यात्रेचे वेध गेल्या पंधरा दिवसांपासूनच भाविकांना लागले होते. कामदा एकादशीपासून मानाच्या सासनकाठ्या कोल्हापुरात पंचगंगा घाटावर विसावून पुढे डोंगराच्या दिशेचे मार्गस्थ होऊ लागल्या होत्या. शुक्रवारच्या रात्री महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध- प्रदेश, गोवा, गुजरात येथून सुमारे चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीने जोतिबा डोंगर फुलून गेला आहे. यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.
जोतिबा मंदिराच्या दिशेने जाणार्या मार्गावर शुक्रवारी सकाळपासूनच खासगी वाहने, एसटी बस, बैलगाड्या यांची वर्दळ सुरू होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी या मार्गावर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. वाहनांमध्ये बिघाड झाल्यास टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनतर्फे मोफत दुरुस्ती केली जात आहे. तसेच विविध सामाजिक संस्थामार्फत ताक, सरबत, पाणी वाटप केले जात होते. यात्रेकरूंचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले आहेत.