
आराम बसमधून बॅगा पळवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
महामार्गावर धावणाऱ्या आराम बसमधील बॅगा लंपास करून त्यातील रोकड आणि दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ब्रिझा कारसह कणकवलीत जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली.मध्य प्रदेशमधील या टोळीला कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जाहीर निजामुद्दीन खान (४०), जाहीर आयुब खान (४०), रब्दर सोजर हुसैन (४०) आणि रफिक नियाज खान (४०, सर्व रा. मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आराम बस थांबतात अशा विविध ठिकाणी मध्यप्रदेशमधील हे टोळके थांबायचे. त्यानंतर प्रवासी आणि आराम बस चालक, क्लिनर याचा डोळा चुकवून बसच्या आतमध्ये जाऊन तसेच डिकीमधून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत असत.
सिंधुदुर्ग हद्दीत असे तीन गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू होता. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण कणकवली विभागाचे पथक गस्त घालत असताना कणकवलीतील हॉटेल ग्रीनफिल्ड येथे चार संशयिताचा वावर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले होते. त्यानुसार गुन्हा अन्वेषणच्या पथकाने तातडीने कारवाई करून या चौघांना ताब्यात घेतले.या सर्वांनी आपण महामार्गावर थांबणाऱ्या बसच्या डिकीमधील बॅगा लंपास करून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करत असल्याची कबुली दिली.